Coronavirus Lockdown : जाना था नाशिक पहुंच गये राजस्थान, प्रेमीयुगुलाने मालगाडीत लपून केला प्रवास अन् मग …

आग्रा : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अशातच एक प्रेमीयुगुल उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एका मालगाडीत लपून नाशिककडे निघाले. विशेष म्हणजे ही मालगाडी उत्तर प्रदेशातून निघून राजस्थानमध्ये पोहचली. तरी देखील या प्रेमी युगुलाचा कोणालाही थांगपत्ता लागला नाही.

दिल्ली-मुंबई रेल्वे लाईनवर असलेल्या हिंडौनसिटी रेल्वे स्थानकाजवळ एका क्रॅसिंगवर गेटमॅनची नजर मालगीडीच्या डब्यात लपलेल्या प्रेमीयुगुलावर पडली. त्याने तात्काळ याची माहिती रेल्वे स्थानकाच्या मास्तरला दिली. यानंतर स्टेशन मास्तरांनी ही मालगाडी हिंडौनसिटी रेल्वेस्थानकावर थांबवली आणि जीआरपीच्या मदतीने मालगाडीत लपलेल्या प्रेमीयुगुलाला खाली उतरवले. यानंतर गंगापूरसिटी जीआरपीला याची माहिती देण्यात आली. गंगापूर सिटी जीआरपीने या प्रेमी युगुलाला ताब्यात घेऊन गंगापूर सिटीत नेले.

प्रेमीयुगुलाकडे सखोल चौकशी केली असता ते यूपीतील बरनाल प्रहलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैनपुरी येथील असल्याची माहिती समजली. जीआरपीने संबंधित पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. यावर संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार या पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संबंधित प्रेमीयुगुलाच्या कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. या दोघांचे कुटुंबीय यूपी पोलिसांसह गंगापूर सीटीकडे रवाना झाले असून त्यांना कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

याप्रकरणी जीआरपी ठाण्याचे प्रमुख लक्ष्मण सिंह यांनी सांगितले, संबंधित ठाण्याचे पोलीस आणि कुटुंबीय आल्यानंतर या प्रेमीयुगुलाला त्यांच्या स्वाधीन करण्यात येईल. प्रहलादपूर येथील आरती कटारीया आणि बरनाल प्रहलादपूर येथील सहदेव अशी या प्रेमीयुगुलाची नावे आहेत.