Coronavirus : जून, जुलैमध्ये ‘कोरोना’बाधितांची संख्या वाढणार !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला असून लॉकडाउनचा दुसरा टप्पा संपण्याची तारीख जवळ आली आहे. असे असतानाही लॉकडाउन पुन्हा वाढवला जाणार आहे की नाही याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्यानुसार जून, जुलै महिन्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता मोदींनी व्यक्त केली आहे. छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टी एस सिंग देव यांनी ही माहिती दिली आहे.

छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टी एस सिंग देव यांनी सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून, जुलै महिन्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे व्हायरस बराच वेळ आपल्यासोबत असणार आहे. हे पाहता आण त्यादृष्टीने पुढील धोरण आखणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. कोरोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे 20 देश यामध्ये भारताबरोबर होते तिथे आज 7 ते 8 आठवड्यांनी भारताच्या तुलनेत 100 पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे.

कितीतरी मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आपण योग्य वेळी लॉकडाउनचा निर्णय आपण घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली, जनतेने देखील साथ दिली त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला ते आपण पाहतोय. पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला 21 दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसर्‍या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे.