Lockdown : 3 मे नंतर पुण्याच्या ‘त्या’ भागात कडक निर्बंध, इतर ठिकाणचा भाग खुला होणार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे लागू असलेला लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार असून ४ मे नंतर पुण्यातील ९० टक्के भाग खुला केला जाणार आहे. यात कोरोनाने प्रभावित असलेल्या केवळ ३० चौरस किलोमीटर क्षेत्रात कडक नियम लागू राहतील. तर बाकीची दुकाने, बांधकाम आणि इतर उद्योग सुरु होतील.

याबाबत महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली असून कोरोनामुळे शहरभर संचारबंदी लागू करून संपूर्ण शहराला सील केले गेले होते. हा लॉकडाऊन आता ३ मे रोजी संपत असून कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणीच निर्बंध लागू केले जाणार आहेत.

क्षेत्रीय कार्यालयात ३३९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या पुण्याची विभागणी करण्यात आली आहे. त्यातील भवानी पेठ, शिवाजीनगर-घोले रोड, कसबा पेठ, विश्रामबागवाडा, डी पी रोड, येरवडा-कळस-धानोरी हे भाग रेड झोनमध्ये असून हा भाग ८१ चौरस किलोमीटरचा आहे. पण त्यातील झोपडपट्ट्या आणि काही दाट वस्ती असलेल्या भागात कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे आणि या भागाला मायक्रोक्लस्टर असे संबोधत इतर भागातील नियम शिथिल केले जातील. बाकीच्या ३०० चौरस किलोमीटर भागातील नियम हटवले जातील. तसेच या भागातील लोकांना कोणत्याही पासची आवश्यकता नाही.

तसेच पुणे महापालिकेच्या हद्दीलगत असलेले उद्योग सुरु होतील याची आशा असून हिंजवडी येथील आयटी कंपन्या, औषधनिर्मिती, कृषीसंबंधित उद्योग यांचा त्यात समावेश असेल. तसेच बांधकाम आणि मेट्रोची कामेही सुरु होतील.