मंत्री जितेंद्र आव्हाड रुग्णालयात दाखल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी रात्री उशीरा ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्राी अचानक ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

आव्हाड यांची काही दिवसापूर्वीच कोरोना चाचणी कऱण्यात आली होती. ही चाचणी निगेटीव्ह आली होती. मात्र आव्हाड यांच्या संपर्कात असणार्‍या लोकांना कोरोना झाल्याचे उघड झाल्यानंतर ते मागील काही दिवसांपासून होम क्वारंटाइनमध्ये होते. मात्र मंगळवारी रात्री अचानक त्यांना ताप आल्याने ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या बंगल्यावर काम करणार्‍या काही कर्मचार्‍यांना आणि कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वृत्ताला राष्ट्रवादीतील सूत्रांकडून दुजोरा देण्यात आला आहे. 12 एप्रिल रोजी ठाण्यातील एक वृत्तवाहिनीचा पत्रकार, त्याचा कॅमेरामॅन, तीन पोलिस शिपाई आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. हे सर्व मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात आले होते. एका पोलीस आधिकार्‍याच्या संपर्कात आव्हाड आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळफास 14 जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाची कोरोना चाचणी पार पडली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र आता मंगळवारी अचानक आव्हाड यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.