Coronavirus : दिलासादायक ! देशातील 70 लाख लोकांनी केली ‘कोरोना’वर मात

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यातच भारतात सप्टेंबर महिन्यात नवीन सापडणाऱ्या रुग्णांनी नवं नवे उच्चांक गाठले होते. पण ऑक्टोबर महिन्यात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील कोरोना संसर्गित रुग्णांनी ७९ लाखांचा टप्पा पार केला असून, एका लाखांहून अधिक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ नोंदवण्यात येत आहे.

देशातील ७० लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. ऑक्टोबर महिन्यात नवे रुग्ण सापडण्यापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगिल्यानुसार, देशभरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के झाले आहे. देशातील अनेक राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. कोरोनाच्या या आकडेवारीने संकटात मोठा दिलासा प्राप्त झाला आहे.

दरम्यान, देशात रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले असले तरी, चाचणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मास्क, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग, घरगुती विलगीकरणच्या माध्यमातून खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. विविध रुग्णालयात क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना संसर्गित रुग्णांवर योग्य उपचार सुरु आहेत. कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही.

कोरोनावरील स्वदेशी लस नेमकी कधी उपलब्ध होणार ?

जगभरात अनेक देशांत कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. भारतीय कंपनी भरात बायोटेक स्वदेशी कोरोना लस ‘कोवॅक्‍सिन’ वर काम करत आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ‘कोवॅक्‍सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिली आहे. ही स्वदेशी लस जून २०२१ पर्यंत उपलब्ध होईल, असा दावा कंपनीने केला आहे. ‘कोवॅक्‍सिन’ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी १२ ते १४ राज्यातील २० हजारांहून अधिक नागरिकांवर होणार आहे. मार्च अखेरपर्यंत लसीचे सर्व परिणामांची माहिती मिळू शकते.