Coronavirus : बारामतीमध्ये ताबडतोब ‘भिलवाडा पॅटर्न’ राबवा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर बारामतीत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर कोराना रोखण्यासाठी बारामतीत भिलवाडा पॅटर्न राबवण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. यामुळे संपूर्ण बारामती शहर सील करण्यात येणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना रस्त्यावर फिरण्याची परवानगी असणार आहे.

कोरोनामुळे बारामतीत गुरुवारी एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबातील दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बारामतीमधील कोरोनाबाधितांची संख्या सहावर पोहोचली आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी अजित पवार यांनी बारामतीत भिलवाडा पॅटर्न राबवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन सर्वच कुटुंबांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसरातील लोकांची तीन वेळा तपासणी केली जाणार आहे. शहरात सर्वत्र नाकाबंदी असून कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. कोणीही बाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जीवनाश्यक वस्तू लोकांना घरपोच केल्या जाणार आहेत. नागरिकांना नियमाचं पालन करत भाजी, किराणा, औषध या वस्तू ऑर्डरप्रमाणे घरपोच केल्या जाणार आहेत. नागरिकांना प्रशासनाकडून हेल्पलाइन नंबर देण्यात आला असून यावरही कंट्रोल रुमची नजर असणार आहे. सोबतच एखाद्या कुटुंबात निधन झाल्यास कमीत कमी लोकांमध्ये अंत्यसंस्कार पार पाडण्याचा आदेश आहे.

भिलवाडा पॅटर्न नक्की कसा आहे.
राजस्थानमधील भिलवाडा येथे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची देशभरात चर्चा आहे. डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. . त्यामुळे भिलवाडा येणार्‍या दिवसांमध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट होईल अशी चर्चा होती. येथील रुग्णांची संख्या 27 वर पोहोचली होती. पण नंतर प्रशासनाने तत्काळ निर्णय घेत शहराच्या सीमा सील केल्या. सर्व हॉटेल्स आणि खासगी रुग्णालये ताब्यात घेतली. प्रत्येक घरी जाऊन लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.