चीनच्या ‘या’ मोठया निर्णयामुळे संपूर्ण जगालाच बसणार फटका?

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे परदेशांमधून भारताला मदत मिळत आहे. मात्र असे असताना भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन चीनने घेतलेल्या एका निर्णयाचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे. चीनने मालवाहू विमानांच्या उड्डाणांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे कच्च्या मालाचा पुरवठा थांबल्याने भारतातील औषध निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगभरात औषधांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतात मोठ्या प्रमाणात औषधांचे उत्पादन होते. जगभरात भारताकडून औषध आयात करणाऱ्या देशांची संख्या मोठी आहे. अमेरिका देखील औषधांसाठी भारतावर अवलंबून आहे. मात्र भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन चीनने सरकारी विमान कंपनी सिचुआन एअरलाईन्सच्या मालवाहू विमानाची उड्डाण रद्द केली आहेत. त्यामुळे भारताकडून औषधे आयात करणा-या देशासमोर अडचणी वाढल्या आहेत. याबद्दल भारतीय औषध निर्मिती संघाचे अध्यक्ष महेश दोषी यांनी चिंता व्यक्त केली. भारतात तयार होणाऱ्या औषधांसाठीचा 60 ते 70 टक्के कच्चा माल चीनहून येतो. त्यामुळे चीनने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम औषध उत्पादनांवर होण्याची भीती दोषींनी व्यक्त केली आहे. याबाबत दोषी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे.