‘कोरोना’ असूनही ‘हा’ देश ‘लॉकडाऊन’ शिवाय राहिला, काय झाला फायदा ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना साथीची सुरूवात झाल्यानंतर युरोपमधील एका देशाने अमेरिका आणि ब्रिटनलाही चकित केले होते. सुमारे एक कोटी लोकसंख्या असलेल्या स्वीडनने इतर देशांच्या लॉकडाऊन मॉडेलला नकार देत साथीच्या काळात एक ‘प्रयोग’ करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता या प्रयोगाचे घातक परिणाम दिसू लागले आहेत.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार साथीचा प्रादुर्भाव झाल्यानंतरही लॉकडाऊनचा अवलंब न केलेल्या स्वीडनमध्ये मृतांचा आकडा तर वाढलाच, परंतु अर्थव्यवस्थेला देखील त्याची झळ बसली आणि बरेच नुकसानही सहन करावे लागले. तथापि, आता देखील बरेच देश वेगाने लॉकडाऊन उघडण्याचे निर्णय घेत आहेत. एक कोटी लोकसंख्या असलेल्या स्वीडनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 74 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत आणि 5500 हून अधिक लोक मरण पावले आहेत. म्हणजेच लॉकडाऊनचा अवलंब करणाऱ्या शेजारच्या देशांपेक्षा स्वीडनमध्ये हजारोंनी मृत्यूंची संख्या अधिक आहे. 55 लाख लोकसंख्या असलेल्या फिनलँडमध्ये केवळ 329 लोकांचा मृत्यू झाला आहे.

वॉशिंग्टनमधील पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचे वरिष्ठ सहकारी जेकब एफ किर्केगार्ड म्हणतात की या प्रयोगातून स्वीडनला काहीही फायदा झाला नाही हे स्पष्ट आहे. हे स्वत:ला जखमी करण्यासारखे आहे आणि त्यांची अर्थव्यवस्थाही सुधारली नाही. स्वीडनमध्ये लॉकडाऊन नसतानाही अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचले कारण लोकांनी खरेदी कमी केली आणि शेजारच्या देशांमध्ये लॉकडाऊनमुळे कंपन्यांच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला. यामुळे स्वीडनमधील कंपन्यांना उत्पादन थांबवावे लागले.

नंतर जेव्हा स्वीडन सरकारने नियम बदलण्यास सुरुवात केली, तेव्हा उशीर झाला. जेकब एफ किर्केगार्ड म्हणतात की सरकारने अर्थव्यवस्थेत वाढ मिळवून देण्याचा दावा केला होता, पण तसे झाले नाही. त्याच वेळी अमेरिकेत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर कोरोना प्रकरणांनी पुन्हा रेकॉर्ड बनवण्यास सुरवात केली आहे. एका दिवसात सुमारे 60 हजार नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. दरम्यान सध्या ब्रिटनमध्येही पब आणि रेस्टॉरंट्स सुरू करण्यात आले आहेत.