Coronavirus : बाधित असताना फेर्‍या मारूनही मिळत नव्हते बेड, ‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर ‘त्याने’ उभारले हॉस्पिटल

बेंगळुरू  : पोलीसनामा ऑनलाइन  –  एकाला कोरोनाची लागण झाली आणि त्यानंतर बेड मिळवण्यासाठी एका रुग्णालयाच्या सतत फेर्‍या माराव्या लागल्या. त्यांच्या कुटुंबीयांनीही ‘त्यांना पाच रुग्णालयामध्ये नेले. पण, कुणीही त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. एका मित्राच्या शिफारशीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले.अन् करोनावर मात करून बरे झाल्यानंतर ‘त्या’ व्यक्तीने सर्वप्रथम स्वत:चे हॉस्पिटल बनविले. आपल्या सारखा इतर रुग्णांना त्रास होऊ नये, म्हणून त्याने हॉस्पिटल सुरू केले. ही घटना कर्नाटकातील बेंगलुरू इथली. संजय गर्ग असे या कोरानामुक्त झालेल्या आणि हॉस्पिटल बांधलेल्याचे नाव आहे.

संजय गर्ग यांचे वय 49 असून त्यांची प्रकृती बिघडली होती. तपासणी केल्यानंतर 28 जून रोजी त्यांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. यानंतर रुग्णालयात दाखल होण्यासाठी खूप प्रयत्न केले. कोरोनाबाधित रुग्णासह त्यांच्या कुटुंबीयांना हॉस्पिटलच्या फेर्‍या माराव्या लागल्या. पण, त्यांना कोणीही उपचारासाठी दाखल केले नाही. यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत होते, असे गर्ग यांनी सांगितले आहे.

गर्ग पुढे सांगतात की, आम्ही अग्रवाल समाजातून येतो. करोना आजारातून बरे होताच समाजातील मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्याशी संपर्क साधला. कोविड केअर सेंटर बनविण्याचे काम त्यांनी क्वारंटाइनमध्ये असतानाच सुरु केले होते. त्यांनी जिगनी होबलीच्या मीनाक्षी मॅडोसचे रुपांतर 42 बेडच्या आग्र सेवा कोविड केअर सेंटरमध्ये केले.

कोविड केअर सेंटरसाठी आम्ही आरोग्य विभाग आणि खासगी रुग्णालयांशी संपर्क साधला. त्यांनी कोविड केअर सेंटरसाठी दोन डॉक्टर आणि चार परिचारिका दिल्या. इथल्या खोल्यांना रुग्णालयाप्रमाणे तयार करून बेड लावले. आता डॉक्टर, परिचारिका रूग्णांवर उपचार करतात. या केंद्रात वायफाय सुविधा आणि इनडोर गेम्सची सुविधा देखील दिलीय.

गर्ग म्हणाले, मला रुग्णालयात दाखल करून घेतले नाही तेव्हा या समस्येची जाणीव झाली. सुरुवातीला मी रुग्णालय मोफत उपचारांसाठी तयार केले. पण, अधिकार्‍यांच्या सल्ल्यानंतर किमान शुल्क आकारत आहे.