संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘कोरोनामुळे मरणारी माणस जगण्याच्या लायकीची नाहीत’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र असे असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी कोरानाची साथ आणि कोरोनाबळींबाबत वादग्रस्त विधान केले आहे. कोरोनाचा फैलाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मुळात कोरोना हा रोगच नाही तर तो मानसिक आजार आहे. कोरोनामुळे मरणारी माणस ही जगण्याच्या लायकीची नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा असल्याचे ते म्हणाले. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

संभाजी भिडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कोरोनाबाबत हे विधान केले आहे. लहरी राजा, आंधळी प्रजा असा कोरोनाबाबत राज्यात आणि देशात कारभार सुरू आहे. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे. जो तो ती घेईल, सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने स्वच्छ कारभार करण्याचा प्रयत्न करावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दरम्यान, कोरोनाच्या नव्या लाटेमुळे राज्यात आणि देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहेत. काल दिवसभरात राज्यात कोरोनाचे 59 हजार 907 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 30 हजार 296 जणांनी कोरोनावर मात केली आहे.