Pimpri : प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट बनवून देणा-या टोळीचा पर्दाफाश पिंपरी- चिंचवड पोलिसांनी केला आहे. प्रवाशांना प्रवास करण्यासाठी 500 ते 600 रुपयांत हा बनावट रिपोर्ट दिला जात होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 28 बनावट प्रमाणपत्र, 3 हजारांची रोकड, 2 मोबाइल फाेन, असा एकूण 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

राकेशकुमार बस्तीराम वैष्णव (वय 25, धनकवडी, पुणे), पत्ताराम केसारामजी देवासी (वय 33, रा. वाकड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर चिरंजीव (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही), राजू भाटी (रा. वाकड) यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे 500 ते 600 रुपये घेऊन कोरोनाचा रिपोर्ट देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी 500 रुपये देऊन एका इसमाला रिपोर्ट घेण्यासाठी पाठवले. त्यानंतर त्याच्या व्हाटसअ‍ॅपवर कोरोना निगेटिव्ह रिपोर्टची फाईल होती. त्यावरून पोलिसांनी आरोपी वैष्णव व देवासी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोबाइलमध्ये कोरोना निगेटिव्ह रिपोर्टच्या काही पीडीएफ फाईल आढळल्या. आरोपी राजू भाटी आणि चिरंजीव यांनी हे रिपोर्ट बनवून दिल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. बावधन येथील लाइफनिटी वेलनेस इंटरनॅशनल यांच्या नावाचे हे रिपोर्ट असल्याने पोलिसांनी त्याबाबत चौकशी केली असता कोरोनाचे ते रिपोर्ट बनावट असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी वैष्णव व देवासी यांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक निरीक्षक सागर काटे, उपनिरीक्षक समाधान कदम यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.