Coronavirus : PM मोदींचा ‘सार्क’ समोर ‘एमर्जन्सी फंड’चा प्रस्ताव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात कहर माजवला आहे. आतपर्यंत १.५ लाखांहून अधिक प्रकरण समोर आली आहेत. भारतातही कोरोना संक्रमित रुग्णांच्या आकड्याने शंभरी पार केलीये. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ‘सार्क’ देशातील नेत्यांशी चर्चेचं आयोजन केलं. यावेळी पंतप्रधानांनी कोविड-१९ साठी एका एमर्जन्सी फंडचा प्रस्ताव सार्क देशांसमोर ठेवला आहे. इतकंच नाही तर भारताकडून यासाठी १ कोटी डॉलर देण्याचीही घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. दरम्यान, भारतानं घेतलेल्या या निर्णयासाठी सार्क नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले कि, इतक्या कमी वेळेत या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. खास करून नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचे, जे शस्त्रक्रियेनंतर लगेचच या चर्चेत सहभागी झालेत. पंतप्रधान पुढे म्हणाले कि, जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-१९ ला पॅंडॅमिक म्हणून घोषित केलंय. आत्तापर्यंत आपल्या क्षेत्रातही जवळपास १५० रुग्ण समोर आलेत. आपल्यालाही सतर्क राहण्याची गरज आहे. दरम्यान, यासाठी तयार राहा, घाबरू नका, हाच आमचा मार्गदर्शक मंत्र असल्याचं यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं.

परदेशातून आत्तापर्यंत १४०० भारतीयांना परत आणलं आहे. सोबतच शेजारील काही देशाच्या नागरिकांनाही आम्ही मदत करू शकलो, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. दरम्यान, कोविड १९ साठी एक एमर्जन्सी फंड बनवण्याचा मी प्रस्ताव समोर ठेवतोय. भारत यासाठी १० मिलियन अमेरिकन डॉलर मदत देईल. याचा वापर कुणीही करू शकेल, तसेच एमर्जन्सी रिस्पॉन्स टीमसाठी ऑनलाईन ट्रेनिंग कॅप्सूलदेखील आपण बनवू शकतो, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह, नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली, भुतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या कि, चर्चा आयोजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाऊल उचललं त्यासाठी आभार… वुहानमधून आमच्या २३ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठीही धन्यवाद.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटबाय राजपक्षे म्हणाले कि, मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो. संकटाच्या वेळी आपण एकत्र आलो आहोत. २००३ मध्ये ‘सार्स’च्या धोक्याच्या वेळी मालदीवनं सार्कच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. कोणताही देश एकटा या धोक्याचा सामना करू शकत नाही. यासाठी सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे. श्रीलंकेत हा व्हायरस फैलावू नये, हेच आमच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. श्रीलंकेला परतणाऱ्या नागरिकांना १४ दिवसांच्या देखरेखीखाली ठेवलं जातंय. आमच्या देशातील विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, यावेळी उपस्थित पाकिस्तान प्रतिनिधी म्हणाले कि, १३८ देश करोनाच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे कोणताही देश याविरुद्ध पावलं उचलण्यापासून मागे राहू शकत नाही. पाकिस्तान कोविड-१९ च्या फैलाव प्रतिबंधीत करण्यासाठी आत्तापर्यंत यशस्वी ठरलाय. जागतिक आरोग्य संघटनेनंही याबद्दल कौतुक केलंय.