वाढत्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर PM मोदी पुन्हा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. सुमारे सव्वा दोन महिने चाललेल्या लॉकडाऊननंतर देशात अनलॉक करण्याची प्रक्रिया हळूहळू सुरु झाली असतानाच देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच गंभीर आव्हान आरोग्य आणि सरकारसमोर आहे. दरम्यान, देश अनलॉक करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होताच निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करणार आहेत.

देशात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्यान वाढू लागला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. देशातील कोरोना बाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि सरकारसमोर मोठे आव्हान उभे आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये सध्याच्या परिस्थितीवर चर्चा होऊन कोरोनाला रोखण्यासाठी पुढील रणनीती ठरण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जून रोजी होणाऱ्या बैठकीत आसाम, केरळ, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, नागालँड, मेघालय, पुदुच्चेरी, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यंच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. तसेच चंदिगड, लडाख, दादरा नगर हवेली, आंदमान निकोबार, दमण दीव आणि लक्षद्विप या केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होतील.