CoronaVirus : भारतात ‘कोरोना’बाधित रुग्णांच्या संख्येत घट, WHO कडून भारताचे ‘कौतुक’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जागतीक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली होती. मात्र, भारताने कोरोनावर नियंत्रण मिळवले असून भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) भारताचे कौतुक केले आहे. भारताने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात चांगली कामगिरी केल्याचे WHO चे महासंचालक डॉ. ट्रेडोस ए घेब्रियसिस यांनी म्हटले आहे.

ट्रोडोस म्हणाले, भारताने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. यावरुन आपल्याला लक्षात येते की, आपणही या सोप्या सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना केल्या, तर कोरोना व्हायरसवर मात करु शकतो. लशीचा प्रभाव वाढल्यानंतर आपण आणखीही चांगल्या परिणामांची आशा करु शकतो.

भारतात रिकव्हरी रेट 97.16 टक्के
देशात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असले तरी याचा प्रमाण कमी आहे. देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटत असून सध्या याचे प्रमाण 1.40 टक्क्यांवर आले आहे. भारतात 1 कोटी 4 लाख 96 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.16 टक्के आहे. तर देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात आणखी घट झाली असून सध्या मृत्यूचे प्रमाण 1.43 टक्के इतके झाले आहे.

शुक्रवारी देशात 12408 नवीन रुग्ण
देशातील कोरोना बाधितांची संख्या 1 कोटी 80 लाख 2 हजार 591 वर पोहचली आहे. यापैकी 1 कोटी 49 लाख 6 हजार 308 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात शुक्रवारी कोरोनाचे 12408 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 15853 जण बरे झाले आहे. शुक्रवारी 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात बळींची संख्या 1 लाख 54 हजार 813 झाली आहे. देशात आतापर्यंत 49 लाख 59 हजार 445 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. सध्या देशात 1 लाख 51 हजार 460 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.