Pune : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्तदात्यांनी फिरवली पाठ, रक्तपेढ्यांमध्ये रक्तांचा तुटवडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका रक्तपेढ्या आणि रुग्णालयांना बसला आहे. कोरोनाच्या धास्तीने नागरिक रक्तदान करण्यास तयार नसल्याने रक्ताचा तुडवडा भासत असल्याचे शहरातील रुग्णालयं आणि रक्तपेढ्यांच्या माध्यमातून सांगितले जात आहे. तसेच रक्तदान शिबिरावर बंदी असली तरी नागरिक वैयक्तिकपणे रक्तदान करू शकतात, त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन केले जात आहे.

गेल्या वर्षीपासून कोरोना संकटामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. गेल्यावर्षी लॉकडाउनमुळे सर्व काही बंद होते. परिणामी 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये रक्तदान शिबिरांमध्ये निम्म्याहून अधिक घट झाली होती. तसेच संसर्गाचा भीतीमुळे नागरिक रक्तदानासाठी बाहेर पडत नव्हते. त्यामुळे इतर रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती.

याबाबत जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, सध्या आम्हाला दरमहा 1500 ते 1800 रक्त पिशव्यांची गरज पडते. ते उपलब्ध होण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच सामाजिक संस्था, सोसायट्या, शाळा कॉलेजचा स्टाफ या माध्यमातून रक्तदान शिबिरे होणे आवश्यक आहे. अशा शबिरातून रक्तसंकलनामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होणार आहे. तसेच कोरोना लसीकरणानंतर 28 दिवस नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे लसीकरणा आधी रक्तदान करावे. तसेच वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील 2 ते 3 महिने पुरेल या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे असे ते म्हणाले.