Lockdown : वाहतूक पूर्ववत न केल्यास वैद्यकीय वस्तूंचा तुटवडा कायम : वितरक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मुंबईतील वितरकांकडे औषधं, हॅण्ड ग्लोव्जसह इतर वस्तू संपत चाललेले आहेत. त्यामुळे पुरवठा पूर्ववत केला नाही, तर येत्या आठ दिवसात महाराष्ट्रात पुन्हा नवीन संकट निर्माण  होण्याची शक्यता झाली आहे. देशात लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होत आहे. सध्या सर्वांच्या गरजेची असणारी औषधे आणि सर्जिकल संबंधित असणार्‍या गोष्टी मुंबईत कमी प्रमाणात येत असल्यामुळे आणखी आठ दिवसांनी त्यांचाही तुटवडा जाणवणार आहे. कोरोनामुळे संपूर्ण राज्यामध्ये औषध, हॅण्ड ग्लोव्ज, पीपी किट यांची मागणी वाढत चालली आहे.

महाराष्ट्रामध्ये होलसेल विक्रेत्यांकडे जेवढा साठा उपलब्ध होता तो कमी वेळेतच विकला गेलेला आहे. आता नवीन वस्तू पुन्हा मुंबईत मागवायचा झाल्या, तर त्या विविध राज्यांमधून मागवाव्यात लागत आहेत. मात्र लॉकडाऊन झाल्यामुळे राज्यातील आणि परराज्यातील ट्रान्सपोर्ट कंपनी हा माल वितरकांकडे पोहोचवण्यासाठी तयार होत नाहीत.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणार्‍या सर्व महत्त्वाच्या गोष्टीचा पुरवठा सुरळीत असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. भाजीपाला, दूध, धान्य यांचे वितरण सुरु आहे. तसेच औषधांचे वितरण हे सुरु आहे. मात्र राज्या बाहेर असणार्‍या विविध फॅक्टरीमध्ये तयार असलेला माल मुंबईत आणण्यासाठी कोणीही तयार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरातील काही महत्त्वाच्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांना परवानगी देऊन राज्यभरातील फॅक्टरीमध्ये तयार असलेली औषध, हॅण्ड ग्लोज तसेच सर्जिकल संदर्भात असणार्‍या वस्तू यांचा पुरवठा करुन द्यावा अशी मागणी होत आहे.

मेडिकलशी संबंधित होलसेल व्यापार्‍यांकडे कंपनीत माल येणे कमी झाले आहे. भविष्यात राज्यात औषधांचा तुटवडा जाणवू शकतो. कारण कंपनीपासून होलसेल दुकानापर्यंत माल आणण्यासाठी ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध नाही. सध्या केवळ मास्क किंवा मेडिकल संदर्भातलं इतर साहित्य मागवायचे असेल, तर पूर्ण ट्रकचे भाडे भरावे लागत आहे. वस्तू केवळ 10 हजाराची असल्यास त्याचे भाडे वीस ते पंचवीस हजार रुपये होत आहे. त्यामुळे हे भाडे परवडण्यासारखे नाही. माल पोहोचवण्यास संदर्भात आणि भाड्या संदर्भात ट्रान्सपोर्ट कंपनीकडून टाळाटाळ केली जात आहे.