‘कोरोना’ व्हायरसबद्दल केली गडबड, ‘या’ देशातील आरोग्य मंत्र्याला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झिम्बाब्वेमध्ये कोरोना व्हायरस टेस्ट किटच्या खरेदीबद्दल आरोग्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. आरोग्यमंत्री ओबादियाह मोयो यांच्यावर कोरोना व्हायरस टेस्ट किट आणि इतर उपकरणांसाठी ४५६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

मात्र शुक्रवारी अटक झाल्यानंतर शनिवारी कोर्टाने त्यांना जामीन दिला आहे. आरोग्यमंत्र्यांना जामीन दिल्यावरून तपास यंत्रणांनी विरोध केला नाही. मात्र दोषी ठरल्यास त्यांना १५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.

तसेच आरोग्यमंत्री ओबादियाह यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर केल्याचाही आरोप आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, त्यांच्यावर ड्रॅक्स इंटरनॅशनल एलएलसी आणि ड्रॅक्स कन्सल्ट एसएजीएल कंपन्यांशी झालेल्या व्यवहारात भ्रष्टाचाराचा आरोप आहे. सरकारी वकिलांचे म्हणणे आहे की, या कंपन्यांसह बेकायदेशीरपणे करार केला गेला. नंतर झिम्बाब्वेच्या अध्यक्षांनी संबंधित कंपन्यांशी केलेला करार रद्द केला होता.

मागच्या आठवड्यात संयुक्त अरब अमिरातीच्या कंपनी ड्रॅक्स इंटरनॅशनलच्या एका स्थानिक प्रतिनिधीलाही अटक करण्यात आली होती. मात्र कंपनीने भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत.

झिम्बाब्वेमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ४८० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच शेजारील देश दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची ९७ हजाराहून अधिक प्रकरणे आढळली आहेत.