Coronavirus : चिंताजनक ! पुणे विभागात आतापर्यंत 472 ‘कोरोना’बाधित तर 42 जणांचा मृत्यू, जाणून घ्या आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं संपुर्ण जगात थैमान घातलं आहे. देशासह महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पुणे विभागात एकुण 472 कोरोनाबाधित आढळून आले असून आतापर्यंत तब्बल 42 जणांचा मृत्यू झाला आहे. आज पुणे शहरात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे फक्त पुणे शहरात मृत्यू झालेल्यांची संख्या आता 39 वर जाऊन पोहचली आहे.

बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार पुणे विभागातील 68 कोरोनाबाधित रूग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले आहेत. सक्रिय रूग्णांची संख्या 362 एवढी आहे. आज (बुधवार) मृत्यू झालेले तिघेही पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील होते. मृत्यू झालेल्यांचे वय अनुक्रमे 73,34 आणि 63 असे होते. आजपर्यंत विभागामध्ये एकुण 6236 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 5943 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. 293 नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

प्राप्त अहवालांपैकी 5427 नमुन्यांचे अहवाल हे निगेटीव्ह असून 472 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागातील 33 लाख 93 हजार 921 घरांचे सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले आहे. त्याअंतर्गत तब्बल 1 कोटी 30 लाख 29 हजार 12 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 787 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

बाधित आणि मृत्यू झालेल्या रूग्णांची जिल्हयानुसार आकडेवारी
1. पुणे-पिंपरी-जिल्हा (आतापर्यंत 427 बाधित रूग्ण तर 39 जणांचा मृत्यू)
2. सातारा (आतापर्यंत 11 बाधित रूग्ण तर दोघांचा मृत्यू)
3. सोलापूर (आतापर्यंत 2 बाधित रूग्ण तर एकाचा मृत्यू)
4. सांगली (आतापर्यंत 26 बाधित रूग्ण तर एकही मृत्यू नाही)
5. कोल्हापूर (आतापर्यंत 6 बाधित रूग्ण तर एकही मृत्यू नाही)