Lockdown : मुंबईतून कोकणात जाण्यासाठी जिवंत काकीला ‘मारलं’, पोलिस निरीक्षकाच्या युक्तीमुळं बिंग ‘फुटलं’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे गावी जाण्यासाठी अनेकांनी पोलिसांना कारणे देउन पळवाट शोधली होती. राज्यामध्येही संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले असल्याने जिल्ह्यांच्या सीमा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. मात्र असे असतानाही गावी जाण्यासाठी दोन तरुणांनी जिवंत काकीचा मृत्यू झाल्याचे सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना पोलिसांनी हे नाटक ओळखून त्यांना ताब्यात घेतले आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने घाबरलेल्या दोन तरुणांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र भरणे नाका येथील नाकाबंदीला पोलिसांनी त्यांना अडविले होते. त्यावेळी या तरुणांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील आपल्या काकीचा मृत्यू झाला आहे असे सांगून पोलिसांपुढे हात जोडून जाऊ देण्याची विनंती केली. त्यावेळी ऑन ड्युटी असणारे पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांना तरुणांवर शंका आली. त्यामुळे त्यांनी खरोखर या महिलेचा मृत्यू झाला आहे का हे तपासण्यासाठी घरी व्हिडिओ कॉल लावण्यास सांगितला. संबंधित तरुणांच्या घरचे देखील या नाटकामध्ये सहभागी असल्याने त्यांनाही पोलिसांना महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

व्हिडिओ कॉलदरम्यान पोलिसांसमोर या महिलेला पांढर्‍या कपड्याने गुंडाळून ठेवण्यात आले होते. मात्र पोलिसांना या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता अखेर त्यांनी गावातील पोलीस पाटलाल फोन करुन चौकशी करण्यास सांगितले. काही वेळातच या तिघांचे बिंग उघडे पडले. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची दुचाकीही जप्त केली आहे. या दोघांनाही खेडमध्येच क्वारंटाइन करण्यात आले आहे. आहात तिथेच सुरक्षित राहा असा संदेश अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांनीच केला असला तरी लोक घराबाहेर पडून गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.