Coronavirus : गावी पोहचण्यासाठी 2 तरूण आणि 7 तरूणींनी केला ‘गनिमी कावा’, पोलिसही ‘हैराण’

चिपळून : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे, कंपन्या बंद असून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातही जिल्हा-जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत. टोल नाक्यावर आलेल्या गाड्यांना परत पाठवले जात आहे. अनेक लोक आपल्या घराकडे जाण्यासाठी अनेक युक्त्या वापरत आहेत. साताऱ्यातील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुण आणि तरुणींनी गनिमी कावा करत आपले घर गाठले आहे. मात्र, हे सर्वजण पोलिसांच्या नजरेतून लपून राहिले नाहीत. त्यांच्या या गनिमी काव्यामुळे पोलीस देखील हैराण झाले आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोकण प्रशासनाने देखील कसून तयारी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यांच्या सर्व सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता किंवा व्यक्तींना जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यात येता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकजण इतर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. जिल्ह्याची सीमा बंद केल्याने अनेकांचा जिल्ह्यात येण्याचा मार्ग बंद झाला आहे. मात्र, असे असताना देखील काही जण अनेक युक्त्या वापरताना दिसत आहेत.

सातारा मधील लोणंद येथील खासगी कंपनीत काम करणाऱ्या 2 तरुण आणि 7 तरुणींनी आपलं घर गाठण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. या तरुण तरुणींनी मुख्य मार्गावरील पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी चक्क सह्याद्रीच्या आडवाटांचा आसरा घेत थेट चिपळूनमध्ये प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. ही सर्व मुले सह्याद्रीच्या डोंगर रांगातून येत असल्याची माहिती अलोरे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या सर्व मुला-मुलींना ताब्यात घेऊन क्वारंटाईन केले.

क्वारंटाईन करण्यात आलेली सर्व मुलं-मुली चिपळून-संमेश्वर आणि गुहागर तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून वारंवार सूचना देऊन देखील कोरोनाच्या भीतीने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी अनेकांकडून जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे समोर येत आहे. राज्यात अशा अनेक घटना समोर आल्या असून प्रशासनाकडून जीव धोक्यात न घालता अशाप्रकारे प्रवास करू नये तसेच ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.