हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार, महापौर फडणवीसांवर बरसल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत सुमारे 950 कोरोनामृत्यू दडवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून त्यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी फडणवीस याच्यावर पलटवार केला आहे. हा तर प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे असे नमूद करत महापौर फडणवीसांवर बरसल्या आहेत.

महापौरांनी फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला आहे. त्याचवेळी कोरोना बाधित रुग्णांचा मृतदेह लपवला जाऊच शकत नाही, असेही निक्षून सांगितले. मी तूरडाळीचा घोटाळा ऐकला होता मात्र कोरोना मृतांचा घोटाळा पहिल्यांदाच ऐकत आहे. वस्तुस्थिती लक्षात घेतल्यास कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेह कुणीच लपवू शकत नाही. या मृतदेहावर तातडीने पुढील सोपस्कर करवे लागतात. तरीही मृतांची आकडेवारी लपवली असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असे उघड आव्हानच किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.

कोरोना हा गंभीर आजार आहे. या संकट काळात कुणीच प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये, असे म्हणत राज्यात सध्या अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले जात आहे. ते थांबायला हवं. भाजपने एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून या महामारीत सरकारसोबत काम करायला हवं, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप किती खरे आणि किती खोटे आहेत, हे जनताच ठरवेल, असे महापौर म्हणाल्या. कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासह सगळेच चांगले काम करत आहेत. मुंबई आणि राज्यातील जनता या लढाईत मुख्यमंत्री यांच्या सोबत आहे. ही बाब ओळखून विरोधी पक्षाने आता मानसिकतेत बदल करायला पाहिजे, असेही महापौरांनी म्हटले आहे.