रेमडेसिवीर : जगाला पुरविली जाणारी ‘कोरोना’ची सर्व औषधं US नं केली खरेदी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –    अमेरिकेने कोरोना विषाणूच्या रेमडेसिवीर या पहिल्या प्रभावी औषधाची मोठी खरेदी केली आहे. रेमडेसिवीरच्या ज्या डोसचा पुरवठा जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये केला जाणार होता, अमेरिकेने जवळजवळ सर्व स्टॉक स्वतःच खरेदी केला आहे. हे औषध गिलियड सायन्सेस या अमेरिकन कंपनीने तयार केले आहे. रेमडेसिवीर औषधाने कोरोना रुग्णांचा जीव वाचवला जाऊ शकतो याची जरी पुष्टी झालेली नसेल, परंतु हे औषध काही रूग्णांच्या उपचाराची वेळ कमी करते. म्हणजेच, काही रुग्णांना रेमडेसिवीर औषध देऊन सामान्य स्थितीपेक्षा कमी वेळेत रुग्णालयातून सोडले जाऊ शकते.

एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार अमेरिकेच्या आरोग्य व मानव सेवा विभागाने सोमवारी जाहीर केले की अमेरिकेने रेमडेसिवीर या औषधाची मोठी खरेदी केली आहे. यामुळे आता इतर कोणत्याही देशाला गिलियड सायन्सेस कंपनीकडून रेमडेसिवीरऔषध खरेदी करणे फार कठीण जाईल.

तथापि, गिलियड सायन्सेसने आधीच जाहीर केले होते की ते रेमडेसिवीर या औषधाचे 1.2 लाख डोस अमेरिकेला डोनेट करणार आहेत. पण आता अमेरिकेने 5 लाखाहून अधिक ट्रीटमेंट कोर्स ची खरेदी केली आहे ज्यांचे उत्पादन जुलैमध्ये होणार आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कंपनी जितक्या औषधाचे उत्पादन करेल, त्यामधूनही 90 टक्के औषधं अमेरिका खरेदी करणार आहे.

अमेरिकेच्या आरोग्य व मानव सेवा विभागाचे सचिव अ‍ॅलेक्स एझर म्हणाले की, अध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लोकांसाठी एक उत्तम करार केला आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचा अंदाज आहे की अमेरिकेतील प्रति एक लाख लोकांमागे 98.4 लोकांना कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करावे लागते.