Coronavirus Lockdown : जमिनीवर झोपलेल्या पोलिसांचा फोटो ‘व्हायरल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाच्या लढ्यासाठी सर्वजण इमानइतबारे काम करीत आहेत. त्यामध्ये पोलीस समाजसेवक यांच्यासोबतीने अत्यावश्यक सेवा पुरवाणारे अनेक कर्मचार्‍यांचा समावेश आहे. जीवाची पर्वा न करता अनेकजण दिवस रात्र काम करुन कोरोनाच्या या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीसही या लढाईमध्ये पहिल्या फळीतील योद्धे म्हणून दिवस रात्र झटताना दिसत आहेत. याच पोलिसांवर हल्ले झाल्याच्याही काही घटना समोर आल्या आहेत.

लोकांनी लॉकडाउनचे नियम पाळावेत, सोशल डिस्टन्सींगचा अवलंब करावा यासाठी पोलीस झटताना दिसत आहे. याच सर्व प्रार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेशचे पोलीस उप महानिरीक्षक मधूर वर्मा यांनी पोस्ट केलेला एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

फोटोमध्ये दोन पोलीस हवालदार जमिनीवरच झोपल्याचे दिसत आहेत. एका दुचाकीच्या बाजूला हे पोलीस झोपल्याचे फोटोमधून स्पष्ट होत आहे. चांगला बेड आणि आठ तासाची झोप ही काय चैनीच्या गोष्टी आहे का? हो आहेत जर तुम्ही पोलीस असाल तर अभिमान आहे मला यांचा, या कॅप्शनसहीत वर्मा यांनी हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी कोरोना योद्धे हा हॅशटॅगही वापरला आहे. 30 तासांच्या आत हा फोटो नऊ हजारहून अधिक जणांनी शेअऱ केला आहे. 1 हजार 100 लोकांनी या फोटोवर प्रितिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या पोलिसांच्या कामाचे आणि त्यांच्या निष्ठेचे कौतुक केले आहे. तर काहींनी या पोलिसांना कोरोनासारख्या लढाईमध्ये अधिक सुरक्षित राहण्यासाठी पुरेश्या सोयी देणं गरजेचे असल्याचे म्हटले आहे.