Coronaviurs : संपुर्ण देशात कडक Lockdown पुन्हा अपरिहार्य; वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञांचे मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. मागील काही दिवसांपासून देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने परिस्थिती अटोक्याबाहेर गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार अगदी अखेरचा उपाय असलेला, पण सध्यासारख्या अंशत: नसलेला, मागच्या वर्षाप्रमाणे कडक लॉकडाऊन देशभरात लावलातरच या जीवघेण्या विषाणू संक्रमणाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे मत आता भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञही व्यक्त करत आहेत.

अमेरिकी अध्यक्षांच्या आरोग्य सल्लागारांनी भारतात फारच वाईट परिस्थिती असून लॉकडाऊनच अवश्यक असल्याचे सांगितले हेते. त्यानंतर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देखील अत्यंत कडक असा देशव्यापी लॉकडाऊन हा एकमेव उपाय आता शिल्लक असून तो अपरिहार्य बनला आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. विशेषत: कोरोना संक्रमणाचा दर म्हणजे पॉझिटिव्हिटी दर, 10 टक्के किंवा त्याच्या पुढे असलेल्या शहरांमध्ये आणि भागांमध्ये असा कठोर लॉकडाऊन तात्काळ लावावा, असे मत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरुच आहे. मागील 12 दिवसांपासून लागोपाठ 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तर एका दिवसात कोरोनाचा हा आकडा चार लाखांच्या पुढे देखील गेला होता. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान रविवारी थोडा दिलासा मिळाला आहे. देशात मागील 24 तासात कोरोनाचे 3 लाख 50 हजार 598 रुग्ण समोर आले आहेत. तर 3701 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान 2 लाख 79 हजार 882 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.