नगरसेवक भानगिरे देतात दररोज 100 जनांना जेवण, ऑनलाइन आणि भ्रमणध्वनीवरून घेतात माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला तमाम देशवासियांनी स्वतःहून घरामध्ये बसणे पसंत केले आहे. मात्र, दुसरीकडे हॉटेल, मेस, खानावळी, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या बंद असल्यामुळे अनेकांना उपाशीपोटी राहावे लागत आहे. याची दखल घेऊन अनेक स्वयंसेवी संस्था आणि दानशूरांनी स्वतः त्यांना जेवण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पुणे शहराच्या पूर्व भागातील हडपसरचे शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांचे नाव प्राधान्यक्रमाने पुढे येते.

शाळा-महाविद्यालयातील होस्टेलवरील विद्यार्थी, तसेच उपनगर आणि परिसरामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आले आहेत. मात्र, हॉटेल, मेस, खानावळ आणि खाद्यपदार्थ्यांच्या हातगाड्या बंद झाल्यापासून अनेकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी महंमदवाडी येथील शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी ऑनलाइन आणि भ्रमणध्वनीवरून माहिती मिळाल्यानंतर जेवणाचा डबा पोहोच करण्याची सुविधा सुरू केली आहे. मागिल पाच दिवसांपासून आजपर्यंत 500 जणांना जेवण दिल्याचे भानगिरे यांनी सांगितले. ही सेवा 14 एप्रिल 2020 पर्यंत सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महंमदवाडी येथील भानगिरे नगरसेवकपदाच्या कारकिर्दीपूर्वीपासूनच निराधारांना मदत करण्याचे व्रत हाती घेतले आहे. हडपसर पंचक्रोशीमध्ये त्यांनी अनेकांना सढळ हाताने मदत तर केली आहे. त्याशिवाय नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतः घटनास्थळी जाऊन नागरिकांना आवाहन करीत मदत करीत आहेत, ही बाब झोपडपट्टीसह निराधारांनी बोलून दाखविली आहे. शाळा-महाविद्यालयातील मुलांना शैक्षणिक साहित्यसह त्यांच्या प्रवेशाची अडचणही सोडविण्यासाठी ते प्राधान्यक्रम देत आहेत. ही बाब कौतुकास्पद असल्याचे परिसरातील गरजवंतांनी सांगितले.