Jalna News : लग्नसोहळा आटोपून परतताना अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नसोहळा आटोपून परतताना भरधाव वेगात जाणाऱ्या कारची धडक (Car Accident) दुचाकीला बसली. यामध्ये दुचाकीवरील दाम्पत्य ठार (Couple Died) झाले. हा भीषण अपघात आज (मंगळवार) दुपारी एकच्या सुमारास पाथ्रीकर कॅम्पस समोर घडला. कार औरंगाबादहून जालन्याच्या (Jalna) दिशेने जात होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंदखेडराजा तालुक्यातील गारखेडा तांडा येथील रामेश्वर बाबूराव चव्हाण (वय 45) व त्यांच्या पत्नी इंदूबाई (वय 40) हे दोघे औरंगाबाद येथे एका लग्नसोहळ्यासाठी आज आले होते. लग्नसोहळा पार पडल्यानंतर ते दोघे आपल्या दुचाकीवरून (एमएच 28 एए 4049) गावाकडे परतत असताना भरधाव वेगाने जालन्याकडे जाणाऱ्या कारने (एमएच 01 बीएफ 9391) त्यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात चव्हाण दाम्पत्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.

या अपघातात कारच्या दर्शनी भागाचे तर दुचाकीच्या पाठीमागील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर कार चालक पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून नागेवाडी टोल नाक्यावर त्याला पकडले. त्यानंतर त्याला स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बदनापूर (Badanapur) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक खंडागळे इब्राहिम शेख आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी मृत रामेश्वर चव्हाण यांचे काका शेषराव रायसिंग चव्हाण यांच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बदनापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक खंडागळे करीत आहेत.