लॉकडाऊनमुळं घराचं स्वप्न भंगण्याची शक्यता, CIDCO घर लाभार्थ्यांसाठी 30 जून पैसे भरण्याची शेवटी तारीख

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून सर्व आर्थिक व्यवहार बंद होते. उद्योगधंदे ठप्प पडल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून सर्व स्तरावर आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडको घर लाभार्थ्यांवर घराचे स्वप्न भंग होण्याची वेळ आली आहे. सिडकोने मागील वर्षी काढलेल्या घराच्या मेगा लॉटरीत १५ हजार जणांचे घराचे स्वप्न पूर्ण झालं होते. येत्या ३० जूनला पैसे भरण्याची शेवटची तारीख आहे. परंतु, लॉकडाऊन मुळे होमलोनची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे अनेकांच्या हातून घर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणून सध्याची परिस्थिती पाहता सहा महिने मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

मागील वर्षी नवी मुंबई, पनवेल भागात स्वस्तात १५ हजार घरांची लॉटरी सिडकोच्या माध्यमातून काढण्यात आली होती. तर घणसोली, खारघर, तळोजा, रसायनी या भागामध्ये अल्प आणि अत्यल्प गटातील लोकांसाठी गृहप्रकल्प उभा केला आहे. सिडकोचे लाभार्थी असलेल्यांना पैसे भरण्यासाठी येत्या ३० जूनची शेवटची तारीख दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात असलेली शेवटची तारीख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढवून ३० जून केली होती. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने सर्व प्रकराची बँकांची कामे रखडली गेली. तसेच लॉकडाऊन मुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पगार कमी झाले. काही जणांना पगार अजून मिळालेला नाही. त्यामुळे सिडकोच्या घराचे लाखो रुपये भरायचे कसे, असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे.

सिडकोच्या घरासाठी अत्यल्प गटासाठी १८ लाख तर अल्प उत्पन्न गटासाठी २५ लाख भरायचे आहेत. गेल्या वेळेस मुदत वाढ दिली असली तरी सिडको सावकाराला लाजवेल असा लाखो रुपयांचा दंड आकारात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सिडकोला मुदत वाढीचे आदेश देताना रक्कम माफ करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करण्यात येतं आहे. तसेच मुदत वाढवून घर लाभार्थ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिलासा देतात का याकडे सर्वच लक्ष लागून राहील आहे.