राहुल द्रविडचा मुलगा ‘समित’नं U-14 ‘टूर्नामेंट’मध्ये बनवले 681 रन, 2 द्विशतक ठोकून माजवली ‘खळबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेटची भिंत मानला जाणारा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड याचा मुलगा समित देखील आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून फलंदाजी करत आहे. लहान वयातच मोठी कामगिरी त्याने केली आहे. अंडर 14 ग्रुप वनडे टूर्नामेंट मध्ये समित द्रविडने दमदार खेळी केली आणि दोन वेळा द्विशतक करून सगळीकडे खळबळ माजवली. जुनियर क्रिकेटमध्ये समित द्रविड हा एखाद्या अनुभवी खेळाडूसारखा भासत होता.

अवघ्या 14 वर्षांच्या समित द्रविडने आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. सोमवारी त्याने दोन महिन्यांच्या आतच दुसरे द्विशतक झळकावले आहे. समित द्रविड सध्या आपला संघ मल्ल्या अदिती इंटरनॅशनल स्कूलकडून अंडर -14 बीटीआर शील्ड सामना खेळत आहे. त्याने श्री कुमाररन संघाविरुद्ध दुसऱ्या वनडे क्रिकेटचे दुसरे शतक झळकावले आहे.

5 सामन्यांमध्ये 3 शतक समितच्या नावावर
समित द्रविडने 33 चौकार – षटकारांच्या मदतीने तब्बल 204 धावा फटकावल्या. ज्याच्या मदतीने त्याचा संघ माल्या आदिती इंटरनॅशनल स्कूलने 3 विकेट गमावून 377 धावांचा स्कोर उभा केला. इतकेच नाही तर समित द्रविडने गोलंदाजीतही चांगली कामगिरी करत 2 बळी आपल्या नावावर केले. या जोरावर संघाने 267 धावांनी विजय मिळविला. 378 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्री कुमारनची टीम केवळ 110 धावांवर बाद झाली.

मागील दोन महिन्याच्या काळात समित द्रविडने आपल्या संघासाठी ५ सामने खेळले आहेत. ज्यात 681 धावा त्याच्या नावावर आहेत. या दरम्यान समितने दोन वेळा द्विशतक, एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. एवढेच नाही तर 227 च्या सरासरीने धावा करणाऱ्या समीतने गोलंदाजी करताना 7 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर पहिल्या दुहेरी शतकाबद्दल बोलायचे झाले तर त्याने 144 चेंडूंत 211 धावा केल्या तर दुसरे दुहेरी शतक 146 चेंडूंनी ठोकले. त्याचवेळी त्याचा धाकटा भाऊ अन्वय द्रविड हा थोडा कमजोर कामगिरी करताना दिसत आहे.