ICC बदलणार 142 वर्षांचा ‘इतिहास’, आता कसोटी क्रिकेट 4 दिवसाचं, ‘हे’ असणार नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक काळ असा होता की कसोटी क्रिकेट बहुधा ड्रॉ होत होते. ५ दिवस खेळूनही सामन्यांचा निकाल लागत नव्हता, पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता जवळपास प्रत्येक कसोटी सामन्याचा निकाल लावला जातो. काही मोजकेच सामने हे अनिर्णीत राहतात. इतकेच नाही तर आता कसोटी सामना ५ दिवसांआधीच संपुष्टात येतात. हा ट्रेंड पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) मोठा निर्णय घेऊ शकते. आयसीसी कसोटी सामना ५ दिवसांवरून कमी करून ४ दिवस करण्याचा विचार करीत असल्याचे वृत्त आहे.

चार दिवसांचा होणार कसोटी सामना !
सन २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद जगातील सर्व बोर्डाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेईल आणि कसोटी सामन्यांचे दिवस कमी करण्याचा विचार करणार आहे. एका वृत्तानुसार, या बैठकीत चर्चा होईल की २०२३ पासून होणाऱ्या टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत होणारे कसोटी सामने ५ दिवस नसून ४ दिवस असावेत. तथापि, जगभरातील क्रिकेटपटू आयसीसीच्या या प्रस्तावाचा विरोध करू शकतात.

जर कसोटी सामने चार दिवसांचे होणार असतील आणि २०१५ ते २०२३ च्या क्रिकेट चक्रानुसार सामने होतील तर आयसीसी किंवा इतर क्रिकेट बोर्डासाठी या परिस्थितीत ३३५ दिवस रिकामे असतील. या रिक्त दिवसांवर आणखी कसोटी सामने खेळले जाऊ शकतात. तसेच जर कसोटी सामने ४ दिवस केले तर एका दिवसात ९० ऐवजी ९८ षटके टाकली जातील. सन २०१८ पासून आतापर्यंत ६० टक्के सामने चार दिवस किंवा त्यापेक्षा कमी दिवसांत संपले आहेत. या कारणामुळे आयसीसी या मुद्यावर गंभीरपणे विचार करीत आहे.

आयसीसीने २ वर्षांपूर्वी २०१७ मध्ये चार दिवसीय कसोटी सामन्यास परवानगी दिली होती. हा कसोटी सामना दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला गेला होता. हा सामना अवघ्या २ दिवसात संपला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना १२० धावांनी जिंकला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/