India vs Australia : ऑस्ट्रेलियानं आखला ‘मास्टर’ प्लॅन; टीम इंडियाला नमवण्यासाठी उतरवणार ‘हुकमी’ एक्का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय क्रिकेट संघाने नवीन वर्ष २०२० मध्ये दमदार कामगिरी करत श्रीलंकेला धूळ चारली आहे. पुण्यात झालेल्या तिसऱ्या ट्वेन्टी – २० सामन्यात श्रीलंकेचा ७८ धावांनी पराभव केला आणि मालीकेत २-० ने दमदार विजय मिळवला. दरम्यान आता टीम इंडियाला नवे आव्हान पेलावयाचे आहे, ते म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जाणाऱ्या तीन वनडे मालिकांचे. या वनडे मालिकेची सुरुवात १४ जानेवारीपासून होणार आहे. तर पहिला सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर रंगणार आहे. त्यामळे कांगारूंना माहित आहे की, टीम इंडियाला त्यांच्याच घरेलू मैदानावर नमविणे सोपे नसणार आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियाने नवीन मास्टर प्लॅन तयार केला असल्याचे समजते.

जेव्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होती तेव्हा ऑस्ट्रेलियन संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे अतिशय महत्वाचे खेळाडू नव्हते. त्यांची आता वापसी झाल्याने टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. एक वर्षाच्या बंदीनंतर स्मिथ आणि वॉर्नर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार प्रदर्शन केले आहे. स्मिथ ने अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी बजावली तर वॉर्नरने पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत जोरदार खेळी केली. त्यामुळे या दोन फलंदाजांमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात.

ऑस्ट्रेलियाने या भारतीय दौऱ्यात रणनीती आखली असून त्यानुसार त्यांनी संघात एक हुकमी एक्का उतरवला आहे. या हुकमी एक्क्यासाठी स्मिथला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात येणार आहे. अशी रणनीती ऑसींनी आखली आहे. स्मिथ हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असतो. परंतु आता तो तिसऱ्या स्थानी उतरणार असून स्मिथला एका स्थानाचे प्रमोशन मिळालेलं आहे. त्यामुळे आता डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅरोन फिंच आणि स्मिथ अशी आघाडीची तगडी फळी असणार आहे. अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे प्रभारी प्रशिक्षक अँण्ड्य्रू मॅक्डोनाल्ड यांनी दिली आहे.

कसोटी क्रिकेट ज्याने गाजवली तो म्हणजे मार्नस लाबुशेन आता स्मिथच्या जागी म्हणजेच चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे. भारताविरुद्ध तो आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात पदार्पण करू शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे. आणि विशेष म्हणजे या स्थानासाठी पीटर हँड्सकोम्ब, अ‍ॅश्टन अ‍ॅगर आणि अ‍ॅश्टन टर्नर यांच्यातही चुरस पाहायला मिळत आहे. आता ऑस्ट्रेलिया कोणत्या खेळाडूंना मैदानात घेऊन येते यावर सगळे गणित अवलंबून असणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ – अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), डेव्हीड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स करी (यष्टिरक्षक), डी’आर्सी शॉर्ट, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टन टर्नर, पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लॅबुश्चॅग्ने, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झम्पा.

भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/