ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण करून खून करणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जळगाव जिल्ह्यातील वाकडी ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण तसेच खून करून पसार झालेल्या एकाला गुन्हे शाखेच्या युनीट ३ च्या पथकाने कर्वे नगर येथून अटक केली आहे.

स्वप्निल किशोर जोशी (वय २७, रा. गोल्डन पेटल सोसायटी, कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. विनोद लक्ष्मण चांदणे यांचा खून करण्यात आला होता.

चांदणे हे जळगाव जिल्ह्यातील वाकडी ग्रामपंचायतीचे सदस्य होते. ते ग्रामपंचायतीतील गैरव्यवहारांस विरोध करत असल्याने विनोद चांदणे यांचे अपहरण करुन जोशी याने खून केला होता. या प्रकरणी त्यांचे बंधू राजू चांदणे यांनी पहुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा स्थानिक पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आला होता. त्यानंतर चांदणे यांचा खून सुपारी देऊन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार जोशी असून त्याने खुनाचा कट रचला होता.  तो पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने वारजे, कर्वेनगर, कोथरुड भागात जोशीचा शोध घेतला. बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून त्याला सापळा लावून कर्वेनगर भागात अटक करण्यात आली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या  मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय म्हेत्रे, किरण अडागळे, दत्तात्रय गरुड, गजानन गणबोटे आदींनी ही कारवाई केली.