जोगवा चित्रपटातील कथानकाचे विदारक वास्तव पुण्यातील कोंढव्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
पुण्यातील कोंढवा येथे जोगवा चित्रपटाच्या कथानकाप्रमाणेच विदारक वास्तव समोर आले आहे. निसर्गतः पुरुष असणाऱ्या अठरा वर्षीय तरुणास कुटुंबाकडून जोगता होण्यासाठी अमानुष छळ केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाला स्त्री वेषभूषा करून पैसे मागायला लावणे, टाळ्या वाजवत सिग्नल वर राहण्यास भाग पाडणे, देवीचा फोटो घेऊन कुंकू लावत फिरणे, गाणे म्हणायला लावणे असे प्रकार तरुणाकडून करून घेतले जात असल्याचे उघड झाले आहे. या कामासाठी पीडित तरुणाकडून विरोध झाल्यानंतर त्याला अक्षरशः चाबक्याचे फटके, लाथा ,बुक्क्या ,काठीने अमानुष मारहाण केली जात असल्याचे तरुणाने पोलिसनामाला दिलेल्या माहितीमधून समोर आले आहे.

तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याच कुटुंबियांकडून मागील दोन वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक छळ सुरु आहे. तरुण नववीपर्यंत शिक्षण घेऊन नंतर कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये ‘हाऊस किपींग’चे कामे करतो. तरुणाला त्याच्या कुटुंबियांकडून साडी घालून कुंकू लावणे, बांगड्या घालायला लावणे, नकली केस लावून स्त्रियांसारखे बनवून त्याला देवीचा जोगता बनवले जाते. त्याच्याकडुन पैसे मिळावेत या अपेक्षाने त्याला देवीचे गाणे म्हणायला लावणे ,सिग्नलवर पैसे मागायला पाठवणे, टाळ्या वाजवत तृतीयपंथियांप्रमाणे पैसे मागायला लावणे अशा गोष्टी करण्यास भाग पाडले जाते. या कामासाठी जेव्हा तरुण नकार द्यायचा तेंव्हा त्याला चाबकाचे फटके देणे ,लाथा बुक्क्या, काठीने मारहाण तसेच जेवायला न देणे असा अमानुष छळ केला केला जातो.

सोसायटीतील कामाचे पैसे मिळाल्यानंतर त्याला आठ-दहा दिवस घरी सांभाळतात नंतर परत जोगता बनण्यास भाग पाडतात. हा प्रकार सोसायटीमधील नूरजहाँ शेख या समाजसेविकेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याला धीर देण्याचे काम केले. त्याच्याकडून सर्व हकीकत जाणून घेतली आणि त्याच्या घरच्यांना अशाप्रकारचा छळ करून नका असे समजावले. सध्या तरुणाची राहण्याची आणि उपजीविकेची सोय सोसायटीमध्ये करण्यात आली आहे. त्याचे पुढील जीवन पुरुष म्हणून जगण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नूरजहाँ शेख या त्यांच्या संस्थेकडून त्याला मदत करणार असल्याचे त्यांनी पोलीसनामाशी बोलताना सांगितले.