पुणे जिल्ह्यातील पौडच्या तत्कालीन नायब तहसिलदावर अ‍ॅट्रॉसिटीचा FIR

पुणे(हिंजवडी) : पोलीसनामा ऑनलाईन – खरेदी केलेल्या भुखंडाची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याचे तहसिलदारांनी आदेश दिले असताना देखील हिंजवडीचे तत्कालीन गाव तलाठी आणि पौडचे नायब तहसिलदार यांनी संगनमत करून विरोधात निकाल दिला. तसेच मिळकत त्रयस्थ व्यक्तीच्या नावे करून ती हस्तांतरीत केली. या विरोधात अपिल केले असताना देखील तेरा वर्षे यावर निर्णय दिला नसल्याने तत्कालीन नायब तहसीलदार आणि तत्कालीन तलाठी यांच्यविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालीन नायब तहसीलदार एन.बी. धनगर आणि तत्कालीन गाव तलाठी यशवंत बापू सावंत (रा. भोईर कॉलनी, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शशिकांत विश्वनाथ भोसले (वय-५३ रा. येरवडा, पुणे) यांनी फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी दोघांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले यांनी १९९७ मध्ये हिंजवडी येथील सर्व्हे क्रमांक ६.७५ गुंठे जमीन कायदेशीर बाबींची पूर्तता करून खरेदी केली होती. त्याची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्याबाबत पौडचे तत्कालीन तहसिलदार यांनी आदेश दिले होते. मात्र, आरोपींनी संगनमत करून साताबारा उताऱ्यावर नोंद न करता राहूल वाघमारे या व्यक्तीची हरकत असल्याचे सांगून वाघमारे यांच्या अर्जावर खाडाखोड करून नायब तहसिलदार धनगर यांनी चौकशी करून आरोपी यशवंत सावंत यांच्या बाजूने निर्णय दिला. तसेच यशवंत सावंत यांच्या नावे ती मिळकत करून हस्तांतरीत केली. या विरोधात भोसले यांनी अपील केले होते. मात्र, त्यावर १३ वर्षे निर्णय न दिल्याने भोसले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. पुढील तपास सहायकपोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त