सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी दोन अधिकारी निलंबित, अन्य दोघांची चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पूलाचा स्लॅब कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण यात गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर आता या पूल दुर्घटनेप्रकरणी पालिकेकडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. या पुलाच्या ऑडिटसंबंधी जबाबदार असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर, याप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची खात्याअंतर्गत चौकशीही केली जाणार आहे.

सदर पूल दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता ए. आर. पाटील तसेच सहाय्यक अभियंता असणाऱ्या एस. एफ. काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे. मुख्य अभियंता एस. ओ कोरी आणि उपमुख्य अभियंता आर . बी तारे यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार आहे असेही समजत आहे. याप्रकरणी कंत्राटदार मे. आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सदर पूल हा धोकादायक नाही असा निर्वाळा जे. डी देसाई या कन्सल्टंटला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु आहे अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.

या घटनेनंतर, गुरुवारी रात्रीपासून महापालिकेने डेब्रीज हटवण्याचे काम सुरु केले होते. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत हे काम सुरू होते. पहाटेपर्यंत कोसळलेल्या पूलाचा सिमेंटचा स्लॅब काढण्यात आला. स्लॅब काढल्यानंतर जमा झालेला मातीचा ढिगारा हटवण्यात आला.