नोकरीच्या आमिषानं चक्क पोलिस अधिकार्‍याच्या पत्नीला सव्वा 9 लाखाला फसवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीला तब्बल सव्वा नऊ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 1 ते 9 मार्च या कालावधीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी धानोरी परिसरातील एका 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार 5 जणांच्या विरोधात आयटी ॲक्टनुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ह्या उच्चशिक्षित असून त्यांचे पती देखील मुंबई येथे पोलिस दलात कार्यरत आहेत. फिर्यादींना मुंबईतील कंपनीत नोकरी हवी होती. त्यासाठी त्यांनी आपला बायोडाटा नोकरी विषयक संकेतस्थळावर अपलोड केला होता. त्याच माहितीच्या आधारे सायबर चोरट्यांनी फिर्यादींच्या मोबाईलवर संपर्क करून करिअर जॉब्स कंपनीतून बोलत असल्याचे सागिंतले. त्यानतंर त्यांची कंपनी मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळवून देण्यासाठी कन्स्टन्सी म्हणून काम करत असल्याचे सांगत नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. फिर्यादी आपल्या जाळ्यात अडकल्याचे समजताच आरोपींनी विविध कारणे सांगून त्यांच्याकडून तब्बल 11 लाख 65 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. दरम्यान नोकरी मिळत नाही, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी आरोपींकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला. तेंव्हा त्यातील 2 लाख 40 हजार रुपये आरोपीनी परत केले. मात्र अनेकदा प्रयत्न करून देखील 9 लाख 25 हजार रुपये परत मिळत नाहीत याची खात्री झाल्यानंतर फिर्यादींनी सायबर पोलिसात तक्रार केली. तक्रार अर्जाची चैकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिस तपास करत आहेत.