Cyclone Amphan updates : चक्रीवादळ ‘अंपन’पासून धोक्याची सूचना

नवी दिल्ली – वृत्त संस्था – बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ अंपन हे अधिक तीव्र झाले. आज दुपारी 2.30 वाजता ते आणखी रौद्ररूप धारण करणार असून येत्या 12 तासांत ते वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हे वादळ 155 ते 165 किलोमीटर प्रतितास या प्रचंड वेगाने प्रवास करत असून, 20 मेला दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत बांगलादेशच्या हथिया बेटाला आणि पश्चिम बंगालमधील दिघाला पार करून जाईल, अशी शक्यता भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली आहे.

यामुळे बंगालच्या उपसागराजवळ असलेल्या सर्व भागांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आधीच कोरोना महामारीचा तडाखा बसलेल्या ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांना या चक्रीवादळापासून सावध रहावं लागणार आहे.

स्थानिक प्रशासनाने त्याची तयारी सुरू केली असून, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचाच सल्ला देण्यात आला आहे. कोरोनासोबतच चक्रीवादळाच्या काळात नागरिकांना मदत करण्यासाठी तेथील सरकारे सज्ज झाली आहेत.