सांगलीत ऐन ईदच्या सणात सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील सामान भस्मसात

सांगली  : पोलीसनामा ऑनलाईन

सांगलीतील कुपवाड शहरात ऐन ईदच्या सणात  घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील साहित्य जळून खाक झाल्याची बातमी आहे. हा स्फोट शुक्रवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही . पण घराचे छप्पर जळाले असून घरातील सामान देखील जळून खाक झाले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कुपवाड येथील  तराळ गल्लीत भाड्याने राहणाऱ्या असलम मन्सूर मुजावर (वय ५०)  यांच्या खोलीत शुक्रवारी सात वाजण्याच्या सुमारास स्वयंपाक सुरु असताना अचानक घरगुती गॅस ची गळती होऊन आग लागली . यावेळी , खोलीतून सर्वानी बाहेर पळ काढल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.  खोलीत आगीच्या ज्वाला पसरल्याने कौलारू व लाकडी छत जळून खाली कोसळले. खोलीतील सर्व कपड़े, धान्य व इतर साहित्य जळून खाक झाले.  सांगलीच्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असलम मुजावर  तराळ गल्लीत भाड्याने राहतात. घरात ईदच्या सणाची लगबग चालू होती. स्वयंपाकासाठी शुक्रवारी दुपारी सिलिंडर जोड़ला होता. स्वयंपाक सुरू असताना संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक गॅसची गळती  होऊन  आग लागल्याची माहिती समोर आली आहे.यात मुजावर यांचे हजारोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.