मुंबई – पुण्यात ‘दादा मी प्रेग्नंट आहे’च्या होर्डींग्स

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – मुंबईतील गर्दीने गजबजलेल्या दादरमधील प्रभादेवी या ठिकाणी एक  होर्डींग लावण्यात आलं आहे. सध्या हे होर्डिंग नागरिकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तसं पाहिलं तर दादर हे मुंबईतील गजबजलेलं ठिकाण. पहाटेपासून रात्रीपर्यंत या ठिकाणी सतत माणसांची वर्दळ असल्याचंही आपण सर्व जाणतोच. अशातच हे होर्डिंग सर्वांचे लक्ष वेधत आहे. कामाचा व्याप, बदलती जीवनशैली या साऱ्यामुळे सध्याच्या काळात माणसाला एकमेकांकडे पाहायला किंवा चार घटका बोलायलाही वेळ नाही.
तसं पाहिलं तर शहरात आपण ठिकठिकाणी अनेक प्रकारते होर्डिंग असल्याचं पाहतो. अनेकदा आपण बऱ्याच होर्डिंग्सकडे अगदी सहज दुर्लक्षही करतो. कारण शहर आणि या शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले होर्डिंग हे आता जुनं समीकरण झालं आहे. काही ठिकाणी आपण दुर्लक्ष जरी करत असलो तरी काही होर्डीग्स असे असतात जे नागरिकांच्या उत्सुकता वाढवतात. असंच काहीसं होर्डिंग दादरमध्ये चांगलंच गाजताना दिसत आहे. ‘दादा मी प्रेग्नेंट आहे’ या नावाचं हे होर्डिंग आहे. महत्त्वाचं म्हणजे सदर होर्डिंग फक्त  दादरमध्येच नाही तर पुण्यातील कर्वेरोड येथील डेक्कन टी पॉईंट येथेही पाहायला मिळत आहे. परंतु या होर्डिंगमागचा नेमका उद्देश नागरिकांना स्पष्ट झाला नसल्याचे दिसत आहे. असे असले तरी हे होर्डिंग कलाविश्वाशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यात असेच होर्डिंग लागले होते.  ‘शेवडे आय एम सॉरी’ असे हे होर्डिंग असून, असे तब्बल 400 होर्डींग पुण्यात लागले होते. इतकेच नाही तर रणवीर सिंगचे देखील ‘कार्ड मिला क्या’ नावाने होर्डींग्स लागले होते हेही सर्वांना ठाऊक आहेच. विशेष म्हणजे या होर्डींग नंतर लगेचच कोटक महिंद्राने एक कार्ड बाजारात आणले होते. यावरून लक्षात अाले होते की,  हे एक व्यावसायिक होर्डींग होते. आणि आता  ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ हे होर्डींग चांगलंच गाजत आहे. विशेष म्हणजे हे होर्डींग एखाद्या नाटकाचं किंवा चित्रपटाच्या प्रमोशनचं असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या होर्डिंग्स मागचा उद्देश स्पष्ट होत नसल्यामुळे नागरिकांची उत्सुकता प्रचंड वाढल्याचं दिसून येत आहे.