दैनंदिन हवामान अंदाज आता पुण्याऐवजी दिल्लीतून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे वेधशाळेचे दैनंदिन हवामान अंदाज विभागाचे काम बंद करण्यात येणार आहे. हा निर्णय भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) घेतला आहे. येथून पुढे देशातील सर्व स्थानिक विभागांचा हवामान अंदाज यापुढे दिल्ली येथून जारी होणार आहे. हवामानाचे अंदाज दिल्लीवरुन केंद्रीय पद्धतीने जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हवामानाचे अंदाज लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम स्थानिक केंद्राद्वारे करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या हवामानाचे अंदाज जारी करण्याचे काम मुंबई केंद्राकडे देण्यात आले आहे. त्यामुळे मागील नव्वद वर्षे हवामान अंदाजासाठी देशात पुण्याचे असणारे महत्व कमी होणार आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f95cf489-7bac-11e8-8886-7b0e26b28bb6′]

सिमला येथून पुण्यात स्थलांतर झाल्यानंतर एक एप्रिल १९२८पासून दुसऱ्या महायुद्धापर्यंत आयएमडीचे राष्ट्रीय मुख्यालय पुण्यात होते. त्यानंतर मुख्यालय दिल्लीला हलवले गेले. मात्र, स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील हवामान अंदाजाची जबाबदारी पुण्यातील केंद्राकडे राहिली. त्यासाठी उपमहासंचालक (हवामान अंदाज) आणि पुणे वेधशाळा संचालक अशा दोन अधिकाऱ्यांच्या अंतर्गत पुणे वेधशाळेचे काम सुरू होते. आता ही दोन्ही पदे बाद करण्यात आली असून, पुण्यातील केंद्राकडे देशभरातील हवामानाच्या नोंदी दिल्ली आणि मुंबई केंद्राकडे पाठवण्याचे काम देण्यात आले आहे.