दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

रुग्णाच्या मृत्यूस डॉक्टर जबाबदार असून त्यांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाला. या रागातून रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना धक्काबुक्की करुन समानाची तोडफोड केली. हा प्रकार सोमवारी (दि.२१) मध्यरात्री दीडच्या सुमारास दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडला. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

विठ्ठल बबन वाघमारे (वय-३९), सिद्धेश्वर तानाजी गायकवाड (वय-२४), अनिकेत भारत रणदिवे (वय-२४ सर्व रा. तळजाई वसाहत, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे इतर ८ ते १० साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाचे असीस्टंट मॅनेजर नितीन महाबळ (वय-३८ रा. कोथरुड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विठ्ठल वाघमारे याची पत्नी रेश्मा (वय ३०) ही श्वसन तसेच संधीवाताच्या विकाराने आजारी होती. तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा पती विठ्ठल आणि नातेवाईकांनी रेश्माच्या मृत्यूस डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप करुन रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच डॉ. चेतन महाजर यांना धक्काबुक्की केली. तर विठ्ठल वाघमारे याच्या इतर साथिदारांनी रुग्णालयाच्या दरवाजाची काच फोडून पहिल्या मजल्यावरील तीन खुर्चा आणि दोन बेंच तळमजल्यावरील स्वागत कक्षात फेकून दिले. तसेच तेथील संगणक, फोन आणि इतर साहित्यांची तोडफोड करुन रुग्णालयाचे ३० हजारांचे नुकसान केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद जाधव करीत आहेत.