आमदार भीमा मांडवींनी पोलिसांचे ऐकले असते तर….

दंतेवाडा : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील भाजपा आमदार भीमा मांडवी यांनी नक्षली भागात जाऊ नये, असा इशारा पोलिसांनी दिला होता. मात्र यानंतरही मांडवी नक्षली भागात गेले आणि अखरे नक्षली हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. दंतेवाड्यातील पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली आहे.

दंतेवाडा जिल्ह्यात आज नक्षलवादी हल्ल्यामध्ये भाजपचे आमदार भीमा मांडवी यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या गाडीत सुरक्षा दलातील चार जवानही होते. ते देखील या हल्ल्यात शहीद झाले. आमदार मांडवी यांच्या ताफ्यात आणखी एक गाडी होती. या गाडीत सुरक्षा दलातील पाच जवान होते. या हल्ल्यानंतर ते बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.

दंतेवाडा येथील पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली. “पोलिसांनी भीमा मांडवी यांना नक्षली भागात जाऊ नये, असा सल्ला दिला होता. मात्र, यानंतरही आज (मंगळवार) भीमा मांडवी त्या भागात गेले. हल्ल्यानंतर दोन्ही बाजूंनी सुमारे अर्धा तास गोळीबार सुरु होता. भीमा मांडवी यांच्या ताफ्यात आणखी एक कार होती. त्या कारमध्ये पाच जवान होते. या जवानांचा शोध सुरू आहे”, असे त्यांनी सांगितले.