‘आता बळच धरून ओढल्यावर मी काय करू’, राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाचा दौंडमध्ये ‘फज्जा’ !

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन – दौंड तालुक्यातील दापोडी येथे कुल गटातील (रासप) कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये झालेला प्रवेश आणि २४ तासांतच त्यांची पुन्हा कुल गटात झालेली घर वापसी यामुळे राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाचा चांगलाच फज्जा उडाला असून दापोडीमध्ये झालेला राष्ट्रवादीचा पक्षप्रवेश कार्यक्रम सध्या तालुक्यात चांगलाच गाजत आहे.
Rahul-Kul
या बाबत सविस्तर हकीकत अशी की दौंड तालुक्यातील दापोडी येथे काल शनिवार दि.७ सप्टेंबर रोजी कुल गटातील (रासप) कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहिती सोशल मीडियावर झळकली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे उर अभिमानाने फुगून आले. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी ही घटना सोशल मीडियावर शेअर केलीच पण खुद्द राष्ट्रवादीचे नेते आणि तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांच्याही फेसबुक पेजवरून ‛दापोडी ग्रामपंचायतीचे मा. सदस्य व दापोडी वि. का. सोसायटीचे मा. चेअरमन आदरणीय बबनभाऊ खोडवे यांचा रासप मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समर्थकांसह जाहीर प्रवेश’ असा मजकूर फोटोसह व्हायरल करण्यात आला. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते याचा पुरेपूर आनंद घेत असतानाच दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी पक्ष प्रवेश केलेले कार्यकर्ते दापोडी येथे कुल (रासप) गटाने घेतलेल्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभात सहभागी होत व्यासपीठावर दिसून आले.
Ramesh-Thorat
कार्यक्रम संपताच काही पत्रकारांनी बबनराव खोडवे यांना त्यांच्या कालच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत आणि आजच्या कुल गटात सक्रिय सहभागाबाबत विचारले असता त्यांनी मी आमदार राहुल कुल यांचे आजोबा दौंडचे माजी सभापती बाबुराव कुल, वडील सुभाष अण्णा कुल यांचे त्या काळापासून काम करत आलो असून आता आ. राहुल कुल यांचे काम करत आहे. त्यामुळे इकडे तिकडे जाण्याचा काही प्रश्नच उद्भवत नसून माझे वय ८० वर्षे असून ‛आता मला बळच धरून ओढल्यावर मी तरी काय करू’ अशी भावना प्रकट केली आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या प्रवेशाबाबतची हवाच काढून घेतली. पुढे बोलताना त्यांनी मला फोडण्याचा बराच प्रयत्न केला जातो पण मी कुल गटातच असून मी कुठेही गेलो नाही. माझे आणि कुल घराण्याचे संबंध हे तीन पिढ्यांपासून आहेत. त्यामुळे कुणी काही म्हणत असेल तर त्याला काहीही अर्थ नाही असे स्पष्टीकरण दिले. दापोडी येथील उदघाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार राहुल कुल यांसह डॉ. खताळ, जगन्नाथ चव्हाण, भगवान टुले, धनाजी शेळके, किरण देशमुख, युवराज रुपणवर, बबनराव खोडवे यांसह मान्यवर, नागरिक उपस्थित होते.