जनाब देवेंद्र फडणवीस; अडीच वर्षांपुर्वीचं दावत-रोझा-इफ्तारचं ‘ते’ पोस्टर सोशलवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या ‘शिवशाही कॅलेंडर २०२१’ वर भगव्या आणि हिरव्या रंगात उर्दू मजकूर झापल्याने भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यातच आता समाज माध्यमात दावत-रोझा-इफ्तारचा एक फोटो (dawat roza iftar poster) व्हायरल झाला आहे. त्या फोटोत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis)  यांच्या नावापुढे जनाब शब्द आहे. तसेच या फोटोत भाजपच्या अन्य नेत्यांचीही नावे असून, त्यांच्या नावापुढे सुद्धा जनाब असा उल्लेख करण्यात आला आहे.

भाजप नेत्यांचे नाव असलेले हे पोस्टर समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. पोस्टरवरील तारखेनुसार ७ जून २०१८ मुंबईतील सीएसटी परिसरातील पलटण रोड येथील हज हाऊस मध्ये या इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. त्यांच्या नावाचा उल्लेख पोस्टरमध्ये जनाब असा आहे.

तर अन्य पाहुणे म्हणून भाजप नेते शाहनवाझ हुसेन, तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, खासदार पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, किरीट सोमय्या यांचा उल्लेख आहे. पोस्टरवर मजकूर लिहण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर केला आहे.

शिवसेनेच्या कॅलेंडरवरुन भाजपची जोरदार टीका

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर शिवशाही कॅलेंडरचा फोटो शेअर करत “शिवसेनाला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही…,” असा टोला लगावला होता. “शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही,” असे म्हणत शिवसेनेवर सडकून टीका केली होती.