काश्मीरमध्ये पहिल्यांदा उमललं भाजपचं ’कमळ’; 3 जागांवर मिळविला विजय

काश्मीर : वृत्तसंस्था – काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर भाजपनं पहिल्यांदाच जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत (डीडीसी) तीन जागांवर विजय मिळवून ‘कमळ’ फुलवलं आहे. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरंस आणि पीडीपीसारख्या स्थानिक बलाढ्य पक्षांना हरवलं आहे. या विजयानंतर भाजपनं काश्मीरमध्ये आपलं अस्तित्वच निर्माण केलं आहे.

भाजपच्या ऐजाज हुसैन यांनी श्रीनगरच्या खोंमोह-2 जागेवर आणि ऐजाज अहमद खान यांनी बांदीपोरा जिल्ह्यातील तुलैल येथे विजय प्राप्त केलाय. तर, दुसरीकडे पुलवामा जिल्ह्यामध्ये काकपोरा जागेवरही भाजपच्या मुन्ना लतीफ यांचा विजय झालाय. काश्मीर खोर्‍यातील विजय भाजपसाठी मोठा विजय मानला जातोय.

ऐजाज हुसैन यांनी आपल्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज काश्मीरमध्ये भाजपला विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीमध्ये भाजप एका बाजूला तर, दुसरीकडे इतर सर्वपक्ष होते. लोकांनी पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास दाखवला आहे. आजचा निकाल इतर पक्षांना एक जोरदार संदेश देणारा निकाल आहे, असे ऐजाज हुसैन यांनी म्हंटलंय.

देशाच्या विरोधामध्ये काम करणार्‍या गुपकर आघाडीच्या विरोधात भाजपने जोरदार लढत दिलीय. निवडणुकीचे निकाल काय लागतील? याची आधी कल्पना असल्याने गुपकर आघाडीतील पक्ष घाबरुन एकत्र आलेत. त्यांच्या विरोधानंतरही भाजपने विजय प्राप्त केलाय, असेही हुसैन यांनी म्हंटलंय.

जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेसाठी 280 जागांसाठी एकूण 8 टप्प्यांमध्ये मतदान झालं. या निवडणुकीमध्ये एकूण 2178 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. कलम 370, 35-अ रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये होणारी ही पहिली निवडणूक आहे. यंदाची निवडणूक भाजपसाठी महत्वाची होती. संपूर्ण शक्ती पणाला लावून भाजपने या निवडणुकीत प्रचार केला होता. त्याचं फळ भाजपला मिळत आहे. 280 जागांपैकी 231 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये 54 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर, गुपकर आघाडीचे उमेदवार 95 जागांवर आघाडीवर आहेत.