कलयुग ! संपत्तीसाठी मुलीनं आईला झोपेच्या गोळ्या देवुन मारलं, ओव्हर डोसमुळं गेला जीव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मालमत्तेसाठी मुलांकडून आई-वडीलांचा छळ केला जातो. मात्र, मालमत्तेसाठी मुलीनेच आईला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. ओव्हर डोस झाल्याने यामध्ये आईचा मृत्यू झाला. मुलीने आपल्या आजारी आईला पुण्याहून अहमदाबाद येथे नेऊन झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. आईच्या मृत्यूला मुलगीच कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुलीवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारदाबेन पटेल असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रफुल्ला उर्फ दिव्या सुनिल शहा (वय-48 रा. सागर को. ऑप सोसायटी, सिनिगॉन स्ट्रिट, कॅम्प) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीचा भाऊ आनंद श्रवणकुमार पटेल (वय-45 रा. शुक्रवार पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शारदाबेन पटेल या आजारी असल्याने त्यांना त्रास होत होता. त्यामुळे 18 ऑगस्ट रोजी दिव्या शहा यांनी आईला जहांगीर हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांना तसेच आनंद पटेल यांना मनाई केली होती. या ठिकाणी उपचार सुरु असताना शारदाबेन पटेल यांचा 22 ऑगस्ट रोजी हॉस्पीटलमधून डिसचार्ज घेतला. त्यांना वाहनातून अहमदाबाद येथे नेऊन 23 ऑगस्ट रोजी सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.

शारदाबेन पटेल यांच्याकडे 60 लाख रुपये आणि प्रॉपर्टीमधील हिस्सा मिळवण्यासाठी दिव्या शहा यांनी त्यांना प्रवासादरम्यान झोपेच्या गोळ्या दिल्या. झोपेच्या गोळ्यांचा ओव्हर डोस झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूला बहिण दिव्या शहा या कारणीभूत असल्याची तक्रार भाऊ आनंद पटेल याने फरासखाना पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फरासखाना पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com