दुर्दैवी घटना… वडिलांच्या अस्थी गोळा करताना मुलाचा मृत्यू

नागापूर : पोलीसनामा आॅनलाइन –  महालगाव येथील प्रभूजी ठाकरे (७३) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांना मुखाग्नी देण्यात आला होता. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या अस्थी संकलनाला मोक्षधाम येथे गेलेल्या त्यांच्या मुलाला हृदयविकाराचा धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे ठाकरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. जणू काळच त्यांच्यावर रुसल्याचे या घटनेमुळे प्रत्ययास येत आहे.

मुलगा व काही नातेवाईक, ग्रामस्थ अस्थी गोळा करण्यासाठी स्थानिक मोक्षधाम येथे पोहोचले. दरम्यान, मुलगा वसंता (४९)याला हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पूर्वीच घरातील ज्येष्ठ गेल्याचे दु:ख कुटुंबाना न पचणारे होते. त्यातच कर्ते वसंता गेल्याने आता आपल्या पुढील भविष्य कसे जाईल, अशी चिंता त्यांना सतावते आहे.

वडील गेल्याचे दु:ख मुलगा वसंताने मनाला लावून घेतल्याने त्याला हृदयविकाराचा धक्का आला, असावा असे बोलले जाते. घटनेनंतर घरच्या मंडळींनी वसंता यांना लगतच्या रुग्णालयात नेले. तपासणीअंती डॉक्टरांनी वसंताला मृत घोषित केले. दुपारी एक वाजता वसंताच्या मृतदेहावर त्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आठवडाभरात कुटुंबातील दोन जीव गेल्याने अख्खा गाव हळहळला. पश्चात, आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

नगरसेवक सुरेश पाटील विषबाधा प्रकरणाचा तपास संथगतीने

सोलापूर : भाजपाचे नगरसेवक सुरेश पाटील विषबाधा प्रकरणाचा तपास थंडावला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसापासून या प्रकरणाचा तपास झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. तपास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होत नाही. दुसरीकडे सुरेश पाटील यांनी तपास तात्काळ करावा यासाठी तगादा लावला असला तरी पोलिसांकडून धिम्या गतीने तपास सुरू असल्याचे जाणवत आहे. दरम्यान, पाटील हे भवानी पेठ भागात कार्यक्रमाला हजेरी लावून जेवण करत असत, त्यामुळे भवानी पेठ भागातील आणखी काहींची चौकशी होणार असल्याचे समजते.

भवानी पेठ भागातून सुमारे २० वर्षापासून नगरसेवक म्हणून सुरेश पाटील हे निवडून येत आहेत. त्यामुळे भवानी पेठ भागातील कार्यक्रमाला त्यांची हजेरी कायम असायची. ज्याच्या कार्यक्रमाला पाटील यांनी हजेरी लावली होती त्या सर्वांची चौकशी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भवानी पेठ भागातील काहींची चौकशी झाली आहे, आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाटील यांनी दिलेल्या जबाबामध्ये आलेल्या अनेकांची चौकशी झाली आहे.आणखी बऱ्याच लोकांची चौकशी बाकी असल्याचे सांगण्यात येते आहे.

विविध नमुने तपासणीसाठी जोडभावी पेठ पोलिसांनी ते पुणे येथील प्रयोग शाळेकडे पाठवले आहेत. अद्याप त्याचा अहवाल आला नसल्याचे सांगण्यात येते. अहवाल आल्यानंतर तपासाला गती येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.