Sunrise hospital Fire : CM ठाकरेंनी सांगितले आगीतील मृत्यूचे कारण, म्हणाले – वेळेत बाहेर न काढल्याने व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   भांडूपमधील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीत सनराईस हॉस्पिटलमधील 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. २६) दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आगीतील मृत्यू का झाले याचे कारण सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की आग लागली त्यावेळी हॉस्पिटलमधील अन्य कोरोना रुग्णांना तातडीने हलविण्यात आले. मात्र, व्हेंटिलेटरवरील रुग्णांना हलविण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले आहे. दुर्घटना घडल्यानंतर आपण जागे होतो. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात गेल्या वर्षी कोरोना संकटकाळात आरोग्य यंत्रणेची, ह़ॉस्पिटलची गरज भासत होती. त्यामुळे आरोग्य सुविधा वाढविण्याच्या उद्देशाने कोविड हॉस्पिटल म्हणून ड्रीम्स मॉ़लमध्ये सनराईज हॉस्पिटलला परवानगी दिल्याचा खुलासा यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी केला आहे. दरम्यान, अशा आगीच्या घटना घडू नयेत म्हणून राज्यात ज्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल, जम्बो सेंटर उभारले आहेत, त्याचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या हॉस्पिटलची परवानगी येत्या ३१ मार्चला संपणार होती, असेही ठाकरे म्हणाले.