हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी हत्याकांडाची सुनावणी आता ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश सरकारने हिंदू समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्याकांडाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा आणि न्याय मंत्री ब्रजेश पाठक यांनी यासंबंधी न्याय विभागाच्या मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. दिवंगत कमलेश यांची पत्नी किरण तिवारी यांची शुक्रवारी मंत्री ब्रजेश पाठक यांनी भेट घेतली. यावेळी किरण यांनी हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात लखनऊमध्ये करून लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली.

हत्येनंतर पाठक हे कमलेश यांच्या सीतापुर जिल्ह्यातील महमूदाबाद येथील मुळ घरी गेले होते. किरण यांनी मंत्री पाठक यांना त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून दिली आणि पोलिसांकडून चार्जशीट दाखल केल्याची माहिती देऊन खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली. कायदा आणि न्याय मंत्री पाठक यांनी शनिवारी सांगितले की, सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होण्यासाठी मुख्य सचिवांना निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी हाय कोर्टातून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात स्थलांतरित करण्याचे आणि लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी केली जात आहे. यासाठी शासनाकडून हायकोर्ट रजिस्ट्रार यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

पोलिसांकडून चार्जशीट दाखल
कमलेश यांची हत्या 18 ऑक्टोबर 2019 ला झाली होती. यानंतर देशातील विविध भागातून 13 जणांना अटक करण्यात आली होती, यापैकी एकाला जामीन मिळाला आहे. या हत्याकांडप्रकरणी आठ लोकांवर हत्या आणि कट रचल्याचा तसेच पाच जणांवर आश्रय देणे आणि मदत करण्याचा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार्जशीट दाखल केले आहे. या खटल्याची सुनावणी 4 जानेवारीरोजी होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/