शालेय शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे सरकरानं घेतला ‘हा’ निर्णय !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ठाकरे सरकारनं राज्यातील शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती 50 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना (Covid-19) आणि लॉकडाऊन (Lockdown) मुळं राज्यातील शाळा 15 जून 2020 पासून सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळं 15 जून पासून शैक्षणिक वर्ष सुरू करून स्थानिक परिस्थिती नुसार प्रत्यक्ष शाळा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात आल्या. संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहमतीनं यासाठीचे निर्णय घेतले गेले.

राज्यात मिशन बिगिन अंतर्गत सर्व आस्थापना टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना (SOP) देण्यात आल्या आहेत. आता शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही 50 टक्के करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

राज्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था 31 ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थी आणि नियमित वर्गांसाठी बंद राहतील मात्र ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण, दूरस्थ शिक्षण सुरू करण्याासाठी मान्यता देण्यात देण्यात आली आहे. ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण, दूरस्थ शिक्षण, टेलिकाऊंसलिंग आणि त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील खासगी अनुदानित, विनाअनुदानित इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ऑनलाईन, ऑफलाईन, दुरस्त शिक्षण संस्थाशी संबंधित कामांसाठी तातडीनं कामावर रुजू व्हावं असं सरकारनं सांगितलं आहे.