पश्चिम बंगालला अतिसंवेदनशील राज्य घोषित करा : भाजप 

कोलकता : वृत्तसंस्था – निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालला अतिसंवेदनशील राज्य म्हणून घोषित करावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. निवडणुकांच्या काळात प.बंगालमध्ये कायमच हिंसाचाराच्या घटना घडतात. नुकत्याच इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पंचायत निवडणुकांमध्ये झालेल्या हिंसाचारात १०० लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या काळातही इथे हिंसाचाराची शक्यता आहे . असे सांगत त्यांनी या राज्याला अतिसंवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. माध्यमांशी बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले , आम्हाला पश्चिम बंगालमधील स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही . त्यामुळे या राज्यात स्थानिक पोलीसांच्या सुरक्षेखाली निवडणुका घेऊ नयेत , त्यासाठी इथे सीआरपीएफची नियुक्ती करण्यात यावी.

मतदान केंद्रांवर सीआरपीएफचे जवान तैनात करा – तसेच याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले , बंगालमध्ये निवडणुकांदरम्यान अनेकदा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या काळातही इथं हिंसाचाराची शक्यता लक्षात घेता आम्ही निवडणूक आयोगाकडे संपूर्ण पश्चिम बंगाल राज्याला अतिसंवेदनशील राज्य घोषित करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्वच मतदान केंद्रांवर सीआरपीएफचे जवान तैनात करण्याची मागणी केल्याचे प्रसाद यांनी म्हटले आहे. बंगालमध्ये निवडणुकांदरम्यान माध्यमांवरही अघोषित बंदी असते. मात्र, निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी माध्यमांनाही इथे प्रवेश मिळावा , अशी मागणीही निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Loading...
You might also like